- कर्जत-जामखेड विधानसभेचे आ. रोहित पवार यांचा चिंचवडमध्ये आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- शहरातील पाण्याची समस्या कायम स्वरूपी सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या भागातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन त्याचे नियोजन करण्यात येईल. परंतु, भारतीय जनता पक्षाने या मूलभुत समस्येचेही राजकारण केले. पवना धरणातून वाढीव पाणी आणण्याच्या योजनेला त्या पक्षाने विरोध केला. ही योजना पूर्णत्वास जाऊ नये, असे प्रयत्न केले, अशी टीका कर्जत-जामखेड विधानसभेचे आ. रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पवार हे आज शहरात आले होते. त्यांनी किवळे गावठाण, मामुर्डी, आदर्शनगर, विकासनगर, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि नवी सांगवी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक प्रज्ञा खानोलकर, सुमन नेटके, मनोज खानोलकर, लाला चिंचवडे आदी उपस्थित होते.
देशातील लोकशाहीची हत्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निश्चय सामान्य मतदारांनी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाना काटे यांचा विजय निश्चित आहे. भाजपला पराभव दिसू लागल्याने भाजपा गुंडगिरीवर उतरू लागली आहे. शिवसेनेच्या शहराध्यक्षांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे. नागरिक उत्स्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी होत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील हा रोष आहे. तरूणाईने नाना काटे यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे, त्यामुळे त्यांचा विजय ही काळ्या दगडावरच रेघ आहे, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
















