न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२३) :- सर्वोच्च न्यायालयाला ९ मेनंतर दीड महिन्याची उन्हाळी सुटी लागणार आहे. त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय लागल्यास पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, असा माझा अंदाज आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले.
पुणे महापालिकेत शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळी सुटी लागण्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय झाल्यास प्रभाग रचना करणे, मतदार यादी करणे, नागरिकांच्या हरकती-सूचना, त्यावर सुनावणी आदी प्रशासकीय कामे पावसाळ्यात पूर्ण करता येतील. त्यानंतर निवडणूक होऊ शकेल.
उन्हाळी सुटीमध्ये निवडणुकीबाबत काही याचिका आल्यास न्यायालय त्या स्वीकारणार नाही. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईल, असे मी माझे मत व्यक्त केले, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडले असून सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली नाही. महाराष्ट्र सरकारने काही वेळ मागितला. त्यानंतर प्रकरण तब्बल ३ आठवड्यासाठी लांबणीवर ठेवण्यात आले आहे.












