- विक्रीला बळ मिळावे यासाठी मोठी सूट देण्याची कंपन्यांची तयारी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२३) :- गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाली आहे. त्याचा परिणाम आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे लोकांनी स्मार्टफोन खरेदीकडे पाठ फिरविली आहे. विक्रीत सातत्याने घट होत असल्यामुळे स्मार्टफोन कंपन्या संकटात सापडल्या असून, विक्रीला बळ मिळावे यासाठी मोठी सूट देण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अलीकडे स्मार्टफोनच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. मार्चच्या तिमाहीत स्मार्टफोनची विक्री २० टक्के घसरली होती. तसेच स्मार्टफोन विक्रीतील प्रीमियम स्मार्टफोनची म्हणजेच ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या स्मार्टफोनची हिस्सेदारी ४ टक्क्यांवरून वाढून ११ टक्के झाली आहे.
एंट्री लेव्हल तसेच मध्यम स्वरूपातील स्मार्टफोनची विक्री कशी वाढवावी, हा प्रश्न कंपन्या व विक्रेत्यांसमोर आहे. त्यातच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि मोठे रिटेलर यांना हा साठा कसा कमी करावा, याची चिंता आहे. त्यासाठी मोठी सूट योजना आणण्याची तयारी केली जात आहे, असे समजते.
स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या योजनेनुसार, सणासुदीच्या हंगामात नवीन साठा आणून त्यावर ऑफर देण्याचे घाटत आहे. तोपर्यंत जुना साठा निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात क्रिकेट वर्ल्ड कप आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी काही योजना आणल्या जाऊ शकतात.
सध्या सर्वच प्रमुख मोबाईल कंपन्यांकडून नव्या व जुन्या स्मार्टफोनवर मोठी सवलत देत आहेत. जुना साठा कमी करण्यासाठी क्लिअरन्स सेल आणण्याची तयारी काही कंपन्या करीत आहेत. नव्या मॉडेलच्या किमती कायमस्वरूपी कमी करण्याचाही कंपन्यांचा विचार आहे. यंदा वार्षिक सेलच्या आधीच ई-कॉमर्स कंपन्या डिस्काउंट सेल आणू शकतात.