- तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या; आ. अमित गोरखे यांचे तहसीलदारांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी, पिंपरीगाव, फुगेवाडी, मोरवाडी, लालटोपी नगर, दापोडी सखल भागात नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी.
याबाबत पिंपरी चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी दिले आहेत.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात गेली तीन ते चार दिवस सलग अतिवृष्टी होत आहे. नागरिकांचे दैनंदिनी व्यवहार ठप्प झाले आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात कासारवाडी, पिंपरीगाव, फुगेवाडी, मोरवाडी, दापोडी भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. या अशा अस्मानी संकटाच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल झाले, लोकांचे संसार उघड्यावर आले. काही भागात घराच्या भिंती ढासळलेल्या आढळून आल्या. या सर्व पूरग्रस्त भागाची नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पाहणी केली. तहसीलदारांना तातडीने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले.
अतीवृष्टीमुळे विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाला असून विद्युत वाहिन्या उघड्यावर आल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवाव्या. यापुढे नागरिकांनी पुढचे काही दिवस सतर्क राहावे, असेही यावेळी अमित गोरखे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.


















