- प्रशासनाने उरली सुरली जलपर्णी काढण्याची केली नौटंकी..
- ठेकेदाराची मात्र चांदी झाल्याची सर्वत्रच कुजबुज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २६ जुलै २०२४) :- अखेरीस तुकोबांच्या इंद्रयणीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी थेट वरुणराजाने बुधवारी (दि. २४) देहूत हजेरी लावली. पावसाच्या पाण्याने नदीतील जलपर्णी वाहून नेली. प्रशासनाने उरली सुरली जलपर्णी काढण्याची नौटंकी केली. जलपर्णीची योग्यरित्या विल्हेवाट न लावता मोठ्या जेसीबीच्या सहाय्याने ही जलपर्णी पाण्याच्या प्रवाहात पुढे सोडली. तीही भर पावसात. त्यासाठी गाथा मंदिरालगतचा येलवाडीकडे जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या पुलाची वाहतूक काही काळ रोखली होती. ही जलपर्णी काढताना बघ्यांची पुलावर मोठी गर्दी जमली होती. ठेकेदाराची मात्र यात चांदी झाली आहे, अशी कुजबुज सर्वत्र सुरु होती.

देहूतील इंद्रायणीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती. सिंचनासाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रात जलसंपदा विभागाने पाणी सोडले होते. मात्र इंदोरी, आंद्रा धरण या भागात जलपर्णी असल्याने ती वाहून देहूपर्यंत आली. देहूतील वसंत बंधाऱ्याला जलपर्णी अडल्याने तेथून वैकुंठगमन मंदिराच्या मागील काही भागात व गाथा मंदिराच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली होती.

याच भागात नदीकाठावर घाट बांधण्यात आला आहे. या घाटावर श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलेले भाविक इंद्रायणीच्या घाटावर हातपाय धुवून दर्शनासाठी जातात. सकाळी अंघोळ करतात. नदीपात्रात जलपर्णी असल्याने भाविकांना अंघोळ करता येत नव्हती किंवा हातपाय धुतानाही अडचणी येत होत्या. तसेच परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती. डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. नगरपंचायत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जलपर्णी काढावी, अशी मागणी नागरिकांकडून सतत होत होती. परंतु, देहू नगरपंचायत प्रशासन जागीच ढिम्म राहिले. कोणतीही कारवाई केली नाही. परंतु, बुधवारी भर पावसात उरलीसुरली जलपर्णी काढण्याचा दिखावा मात्र प्रशासनाने केला, अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरु होती.
देहूगाव आणि परिसरातील गावांचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळेही इंद्रायणीत जलपर्णी वाढत आहे. प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.















