न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२३) :- संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरुन (दि. ५) सोमवारी विश्व पर्यावरण दिनी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संत निरंकारी मिशन द्वारे संपूर्ण भारतातील १५ पर्वतीय पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा तसेच प्रामुख्याने महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पांचगनी, पन्हाळा, उत्तराखंड राज्यातील मसूरी, ऋषिकेश, लैंसडाउन, नैनीताल; हिमाचल प्रदेशमधील शिमला शहर, मनाली, धर्मशाला; गुजरातमधील सापुतारा, सिक्किममधील जोरेथांग शहर आणि कर्नाटकमधील नंदी हिल्स अशा विविध पर्वतीय स्थळांचा समावेश आहे.
सकाळी ८.३० वाजता या अभियानाला सुरवात केली जाईल. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रार्थनेद्वारे केला जाईल ज्यामध्ये सर्व स्वयंसेवक सहभागी होतील व कार्यक्रमाचा समारोप दुपारी १.०० च्या दरम्याने केला जाईल.
संत निरंकारी सेवादलाचे हजारो स्वयंसेवक आपल्या खाकी गणवेषामध्ये तर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक निळे टी-शर्ट व टोपी घालून स्वच्छतेसाठी सेवारत राहतील. याबरोबरच अन्य निरंकारी भक्तगण व संबंधित शहरातील नागरीक मिळून वृक्षारोपण आणि स्वच्छतेचे मेगा अभियान राबवतील ज्यायोगे प्रकृतीला स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर बनविले जाऊ शकेल.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले, की मिशनचे युवा स्वयंसेवक ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या थीमवर पथनाट्य सादर करतील त्यातून जनसामान्यांना पर्यावरण संकट याविषयी जागरुक करतील. नो प्लास्टिक यूज, बीट एयर पोल्यूशन, स्वच्छता आणि वृक्षारोपण आदि संदेशांवर भर देण्यासाठी मिशनचे स्वयंसेवक विविध घोषणाफलक व बॅनर हातात घेऊन मानवी साखळी तयार करतील. याशिवाय हिल स्टेशनवर लोकांना स्वच्छतेच्या प्रति जागरुक करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात येईल. कार्यक्रमात भाग घेणारे सर्वजण ‘पर्यावरण संरक्षण’ शपथ देखील घेतील.


















