- शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा कायापालट होणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- पुण्यासारख्या आयटी हब म्हणून मिरवणाऱ्या शहरात राज्य शासनाला सर्वात मोठा महसूल मिळवून देणारा एक महत्वाचं विभाग म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफीस. या ठिकाणी रोज लाखोंचे करार नोंदविले जातात. त्यातून शासनाला मोठा महसूल मिळतो. परंतु, या दुय्यम निबंधक कार्यालयाची म्हणजेच रजिस्ट्रेशन ऑफीसमधली परिस्थिती खूपच केविलवाणी आहे. इथला आठवड्यातून चार दिवस सर्व्हर मंदच असतो. काही दिवशी तर चार ते पाच तासांसाठी बंद असतो.
महाराष्ट्रातील सर्वच रजिस्ट्रेशन कार्यालयांची अशीच अवस्था आहे. दस्त ज्या दिवशी नोंदणीसाठी दिले ते त्या दिवशी नोंद होतील ह्याची काहीही शास्वती नाही. छोटे कार्यालय, जिथे बसण्याची नीट व्यवस्था नाही, कोंदट वातावरण, मंद प्रकाश व्यवस्था, तासन तास आपल्या नंबरची वाट बघत बसलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग व्यक्ती व स्वतःचा मौल्यवान वेळ घालवत थांबलेला युवा वर्ग, हे चित्र कधी बदलणार याची वाट पाहतोय.
5 G च्या जमान्यात आपण 50 वर्ष जुन्या व्यवस्थेत राहत आहोत. जो विभाग शासनाला इतका महसूल मिळून देतो त्याची इतकी वाईट अवस्था का? त्याला कारणीभूत भ्रष्ट कारभार, उदासीन जनप्रतिनिधी की शासकीय अधिकारी?. या सर्व्हर डाऊनमुळे रोज किती तरी व्यवहार रद्द होतात, किती तरी महसुलीच नुकसान होत. अनेक महत्वाच्या व्यावसायिक व्यक्तींच्या वेळेच नुकसान होत.
आता पासपोर्ट कार्यालय कात टाकतय, पोस्ट ऑफीस बदलले, एस टी स्टँडसुध्दा नवीन रुपात येत आहे. मग सरकारला पैसे कमवून देणाऱ्या या विभागाची ही दुर्वस्था का? संबंधित शासकीय अधिकारी व जनप्रतीनिधींनी त्यासाठी जलद गतीने निर्णय घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयाचा कायापालट करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.














