न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा कुदळवाडी क्र.८९ येथे नवीन मुलांचे स्वागत प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत गुरूवार दि.१५ जून २०२३ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले.
त्याप्रसंगी कुदळवाडी प्रभागाचे स्वी. नगरसदस्य दिनेश यादव उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॅाकलेट देऊन स्वागत करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
त्यांनी शाळेतील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना निरोप देऊन इथूनपुढे नवीन शाळेमध्येही उत्कृष्ट काम करून या शाळेप्रमाणे त्याही शाळेचा नावलौकीक वाढवावा व नवीन शिक्षकांनीही शाळेचा स्तर उंचावत न्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या वर्षी ८ वीच्या वर्गास मान्यता मिळाल्यानंतर यापुढे दहावीपर्यंत मुलांना कोठेही जायची आवश्यकता राहणार नाही. शाळा दोन शिफ्टमध्ये करून ९, १० वीचेही वर्ग सुरू करणार आहोत, असे दिनेश यादव यांनी सांगितले.
शिक्षण विभागाने शाळेतील १२ शिक्षकांपैकी ६ शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शाळेत विस्कळीतपणा येऊ शकतो. परंतु ९१२ पटाच्या शाळेसाठी आणखी ८ शिक्षकांची आवश्यकता आहे असे प्र.मुख्याध्यापक संपत पोटघन यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन मारूती खामकर व शाळेतील सर्व शिक्षकांनी केले. विठ्ठल बगाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शैलजा गायकर यांनी सर्वांचे आभार मानले.












