न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आपल्या देशातील संस्कृती आणि एकात्मता तोडण्याचा प्रयत्न परकीयांनी केला. मात्र, ते अपयशी ठरले. विविधतेत एकतेचे दर्शन आपल्या देशात अजूनही दिसून येते, असे गौरवोद्गार अर्थतज्ञ खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी भोसरी येथे काढले.
साउथ वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कर्नाटक, आंध्रा, केरळ, तमिळनाडूच्या बांधवांनी एकत्रित आयोजित केलेल्या पंचरत्न पुरस्कार सोहळ्यास डॉ स्वामी यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेवक बाबू नायर, साउथ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, सचिव सुनील गोपीनाथ, कार्याध्यक्ष राकेश नायर, खजिनदार बालचंद्र शेट्टी, सहसचिव कार्तिक कृष्णन आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पंचरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्तीमध्ये निर्मला कृष्णकुमार, नूतन सुवर्णा, वैदेही राजाराम, जयश्री नागराजन (सर्व सामाजिक) नृत्यांगना वर्षा अनंतरामन (कला क्षेत्र) या महिलांचा समावेश आहे. माजी महापौर आर. एस. कुमार (राजकीय), संतोष शेट्टी (सामाजिक), शिवलिंग ढवळेश्वर (शैक्षणिक), गुलाब गोपीनाथ, पीएनके नायर (औद्योगिक) यांना पंचरत्न पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, केवळ सीमेवर लढणे म्हणजेच देशप्रेम नाही तर देशाबद्दल अस्मिता बाळगणे हे देखील देशप्रेम आहे. आपल्या हृदयात देशप्रेम आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे केवळ भौगोलिकदृष्ट्या वेगळे असलो, तरी या देशातील नागरीक म्हणून आपण सर्वजण एक आहोत. हे विसरून चालणार नाही. देशावरील आलेल्या संकटांना पळवून लावण्यासाठी शिवाजी महाराजांसारख्या महापुरुष व क्रांतीकारी यांनी लढा दिला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शृती शशिधरण तर आभार अभिलाष संविधान यांनी मानले.











