- ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिलाचे पिंपळे गुरवमध्ये जल्लोषात स्वागत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- विशेष ऑलिम्पिकमध्ये पिंपळे गुरव येथील ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला पटनाईक हिने जलतरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत दोन पदकांची कमाई केली. तिचे मायदेशी परतल्यावर पिंपळे गुरव येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कॅमिलाने आठशे मीटर पूल स्विमिंग प्रकारात रौप्य पदक, तर दीड हजार मीटर सागरी जलतरण प्रकारात कांस्यपदक जिंकले. याशिवाय विशेष ऑलिम्पिकच्या काळातच तेथे सुपर स्पोर्ट्स इंटरनॅशनल ही स्पर्धा झाली. यामध्ये सर्व वयोगटातील सामान्य आणि विशेष खेळाडू सहभागी झाले होते. यातील सागरी जलतरण प्रकारात दीड हजार मीटरची शर्यतही कॅमिलाने पूर्ण केली.
पिंपळे गुरवमधील कल्पतरु सोसायटी या तिच्या निवासस्थानी परतताच कॅमिलाचे जोरदार स्वागत करण्यात आले. वडील सूर्यनारायण पटनाईक, आई लीला आणि लहान बहिणही तिच्या सोबत गेले होते. या यशामुळे पिंपळे गुरवचे नाव जगभर पोहोचविल्याबद्दल कल्पतरु सोसायटीत कॅमिलाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका वैशाली राहुल जवळकर, जयश्री विजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, नगरसेविका उषा मुंडे, चंदा लोखंडे, नगरसेवक सागर आंघोळकर, कल्पतरू सोसायटीचे चेअरमन विजय बागडे, चेअरमन प्रशांत पाटील, अजय पाटील, चंद्रकांत तिळगुळे, मनोज गुरव, गणेश वाडकर, प्रतापराव शिंदे, जितेंद्र जवळकर, अनिल पिंजन, तसेच सर्व सदस्य, जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कल्पतरू सोसायटीतील महिला, सोसायटी कमिटी आणि राहुल जवळकर मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
दरम्यान, कॅमिलाने वयाच्या १३ व्या वर्षापासून पोहण्यास सुरुवात केली. प्रशिक्षक अभिजित तांबे यांच्याकडे ती सराव करीत होती. पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर ती दररोज ३ ते ४ तास सराव करायची. तिच्या या मेहनतीमुळे २०१५ मध्ये तिने पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत सामान्य खेळाडूंना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता. तेव्हा तिचे प्रशिक्षक अभिजित तांबे यांनी तिला ‘डॉल्फिन गर्ल’ हे नाव दिले. यापूर्वी २०१६ मध्ये इटली येथे झालेल्या स्पर्धेतही ती सहभागी झाली होती. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने सात सुवर्णपदके मिळविली आहेत.
कॅमिला हिला गायनाची आवड आहे. देशभक्तीपर गीते तिला आवडतात. स्पर्धेदरम्यान ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत गाण्याची तिच्या इच्छा होती. परंतु, ती पूर्ण झाली नाही. आगामी स्पर्धांत सुवर्णपदक जिंकून हे गाणे तेथे गाणार असल्याची मनिषा तिने बोलून दाखविली. कॅमिला हिला विविध स्पर्धांच्या निमित्ताने लागणारे सर्व सहकार्य करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांनी सांगितले.
प्रशिक्षकांचा होता तिच्या क्षमतेवर विश्वास
कॅमिला ही एवढ्या मोठ्या स्पर्धेत पदकांची कमाई करेल, असे वाटले नव्हते. मात्र, तिचे प्रशिक्षक अभिजित तांबे यांना तिच्या क्षमतेवर विश्वास होता. त्यामुळे या यशाचे श्रेय त्यांनाच जाते.
– लीला पटनाईक, कॅमिलाची आईमुलीचा अभिमान आहे
माझी मुलगी कॅमिला हिने मिळविलेले यश हे तिने घेतलेल्या कष्टाचे आहे. जागतिक स्तरावर दोन मिळविलेल्या या यशाचा मला खूप अभिमान आहे. तिच्या आनंदासाठी वाट्टेल ते करण्याची आमची तयारी असते. कॅमिला हिला सामाजिक कामाचीही आवड असून, रस्त्यावर काम करणार्या मुलांसाठी तिला काम करण्याची इच्छा आहे.
– सूर्यनारायण पटनाईक











