न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २६ जून २०२३) :- पुणे झोनचा महिला संत समागम संत निरंकारी सत्संग भवन जयजवाननगर, खराडी (फॉरेस्ट पार्क) या ठिकाणी रविवारी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या सत्संग कार्यक्रमासाठी पुणे झोनच्या सर्वच शाखांमधून ३५०० पेक्षा अधिक संख्येने महिलांनी पोहोचून सत्संगाचा आनंद प्राप्त केला.
मुख्य सत्संगच्या अगोदर ब्रम्हनादाचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्राचीन संत परंपरेचा इतिहास दाखविण्यात आला. महिलांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडवून दिले. मुख्य सत्संग दरम्यान समुह गायन, अभंग, कविता, लघुनाटिका तसेच विचारांच्या माध्यमातून महिलांनी सद्गुरु प्रती आपले भाव व्यक्त केले.
ज्या पद्धतीने एक नारी आपला शृंगार करताना कपडे,दागिने अशा एक एक सर्व गोष्टीचे ध्यान ठेऊन शृंगार करते तेव्हा तिचं रूप देखणं बनत त्याप्रमाणे सत्संग, सेवा सुमीरण हे भक्तीचे शृंगार आहेत. आपले जीवन भक्तीने सुंदर बनवायचे असेल तर भक्तीचे हे शृंगार या आपल्या भक्तीत चढविले पाहिजेत तेव्हाच आपली भक्ती देखील पूर्णत्वाला जाणार आहे असे उद्गार दीपा मखिजा जी यांनी सत्संगला संबोधित करताना काढले.
त्यांनी पुढे समजावताना सांगितले की, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाहीत तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. संत मीराबाई, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी सद्गुरुंकडून ब्रम्हज्ञान प्राप्त करून आपल्या भक्तीला सुरवात केली. केवळ ज्ञान प्राप्त करण्याने नाही तर ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याने जीवनात आनंद प्राप्त होणार आहे.
पुष्पा करमचंदानी आणि काबुगडे बहेन यांनी मुख्य अतिथी दीपा मखिजा तसेच संपूर्ण पुणे झोनमधून आलेल्या महात्मा, बहेंनजींचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धन्यवाद व्यक्त केले.














