न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रानुसार महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कामगारांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मेसर्स श्रमिक सहायता एव संदर्भ केंद्र आजीविका ब्युरो ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने कंत्राटी कामगारांना शासकीय विमा योजनांचा लाभ मिळावा यासाठी आज चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीरामध्ये कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, जनधन बँक खाते, बांधकाम कल्याणकारी मंडळ कार्यालय, ई- श्रम कार्ड, पॅन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजना इत्यादी शासकीय योजनांविषयी आणि किमान वेतन कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर शिबीरामध्ये कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, मेसर्स श्रमिक सहायता एव संदर्भ केंद्र आजीविका ब्युरो ट्रस्टचे अमोल लोंढे, भैरव तळपडे उपस्थित होते. या शिबीराला मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. यावेळी कामगारांनी आपले प्रश्न, समस्या, शंका मांडल्या आणि विविध योजनांची माहिती सविस्तरपणे जाणून घेतली.












