- अंमलबजावणीसाठी मुंबईतील संस्थेची नेमणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे रुणालय, दवाखाने अद्ययावत करून रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार सेवा व सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सोशल इम्पॅक्ट बॉण्डद्वारे निधी निर्माण केला जाणार आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सॉयन्स या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.
पालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यांतून शहरातील नागरिकांना उत्कृष्ट आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी सोशल इम्पॅक्ट बॉण्डच्या माध्यमातून त्या सेवेत सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यासाठी रुग्णालय व दवाखान्यात आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. याकरिता सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५ व कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या पॅनेलवरीलमुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टियूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स, दिल्लीचे क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि गुजरातचे इंडियन इन्सिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या तीनपैकी मुंबईच्या संस्थेची १६ जून २०२३ ला झालेल्या सोशल इम्पॅक्ट बॉण्ड समितीच्या बैठकीत निवड करण्यात आली. त्यासाठी येणाऱ्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
सोशल इम्पैक्ट बॉण्डच्या अंमलबजावणीपूर्वी पालिकेचे रुग्णालय व दवाखान्यांतील वैद्यकीय उपचार सुविधा आणि सोईचे सद्यस्थिती जाणून घेतली जाणार आहे. सोशल इम्पॅक्ट बॉण्डच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर वैद्यकीय सेवा व सुविधेत झालेले बदलाचे मूल्यमापन केले जाणार आहे. या संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत २० फेब्रुवारी २०२३ ला बैठक झाली. बैठकीत सोशल इम्पॅक्ट बॉण्डच्या अंमलबजावणीसाठी संस्था नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.














