- भाजपा कामगार आघाडीचे सरचिटणीस किशोर हातागळे यांचा पाठपुरावा फलदायी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड शहराला “स्वतंत्र कामगार कार्यालय” उभारण्याची सर्वात पहिली व यासाठी सातत्याने मागणी व सक्षम पाठपुरावा करणारे एकमेव भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांच्या मागणीला यश आले असुन यासंदर्भात नुकतेच कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी पिंपरी मोरवाडी येथील पाच एकर जागेत “कामगार भवन” उभारण्याच्या पहिल्या टप्प्याला ३८ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्याची घोषणा केल्याने हातागळे यांनी समाधान व्यक्त करत कामगारमंत्री सुरेश खाडे व सरकारचे आभार मानले आहेत
दिनांक २० जानेवारी २०१९ च्या पुर्वीपासुन शहराला स्वतंत्र कामगार कार्यालय उभारण्याची सर्वात पहिली व एकमेव मागणी करणारे किशोर हातागळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कामगारमंत्री यांच्याकडे सातत्याने केली होती. यासाठी कित्येक निवेदने व मागणीपत्र दिली. कामगार कार्यालयाची शहरातील कष्टकरी कामगारांना किती गरज आहे? याची माहिती मुख्यमंत्री, कामगारमंत्री व प्रशासनाला करून दिली. दिवंगत स्व. आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांनाही यासाठी विशेष प्रयत्न करण्याची विनंती केली होती.
शहरात स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, तहसीलदार कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (सध्याचे PMRD) हे अस्तित्वात असताना शहरातील कष्टकरी कामगारांना शासकीय कामासाठी शिवाजीनगर येथील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते, हे अंतर लांब असल्याने महिला व कष्टकटी कामगारांना तिथे जाऊन न्याय मागण्यासाठी अत्यंत अडचणी येत होत्या. याचीच दखल घेत असंघटित क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या किशोर हातागळे यांनी ही कुणाच्याही लक्षात नसणाऱ्या महत्वपुर्ण गोष्टीची मागणी सातत्याने लावुन धरली व प्रत्येक अधिवेशनात याची घोषणा व्हावी अशी आग्रही भुमिका त्यांनी वेळोवेळी घेतली.
नुकत्याच यासंबंधी कामगारमंत्र्यांनी पिंपरी, मोरवाडी येथील पाच एकरच्या भुखंडावर कामगार भवन उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी ३८ कोटी रुपये निधी देऊन येथे कामगार भवन व कामगारांच्या कुटुंबीयांसाठी ईएसआय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे किशोर हातागळे यांनी समाधान व्यक्त करत कामगारमंत्र्यांचे आभार मानले आहेत.












