न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 09 ऑक्टोबर 2023) :- टँकरमधून अवैधरीत्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना लागलेल्या आगीत सलग लागोपाठ नऊ गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.
स्फोटामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट उठले. आगीत टँकरसह तीन स्कूल बस जळून खाक झाल्या. मुंबई- बेंगळुरू महामार्गावर ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ रविवारी (दि. 8) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, जेएसपीएम महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर असलेला एक टँकर होता. या टँकरमधील गॅस अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने आग लागली.
नऊ गॅस सिलेंडरचा एका मागोमाग एक असा स्फोट होत गेला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसनेही पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.













