न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२३) :- मामुर्डी-सांगवडे येथे नव्याने पूल बांधण्यात येत आहे. या पुलामुळे वाहतूक सुरळीत होणार असून सुरक्षित प्रवास होण्यास मदत होणार आहे. तथापि, मामुर्डीकडील ३०० मीटर लांब १२ मीटर रुंद जोड रस्त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. त्याचा खर्च १५ कोटींवरून ५० कोटीवर गेला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या मान्यतेनंतर हा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलासाठी जलसंपदा विभागाच्या परिपत्रकानुसार पुलाची जोता पातळी लाल पूररेषेपेक्षा १.५० मीटर उंचीवर असणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढणार आहे.
पुलाच्या कामासाठी महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १५ कोटी निधीची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेने २९ मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. मामुर्डी बाजुकडील जोड रस्त्यासाठी सुधारित विकास आराखड्यानुसार नदी समांतर रस्ता करण्याचे नियोजन आहे. जलसंपदा परिपत्रकानुसार उच्चतम पूररेषा गृहीत धरू नवीन पूल बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे पूल उभारण्याचा खर्च १५ कोटीवरून २०२२-२३ च्या चालू दरसुचीनुसार ५० कोटींवर जात आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात विशेष योजना लेखाशीर्षांत ५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी (दि. २५) सर्वसाधारण सभेची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे पूल उभारण्यातील निधीचा अडसर दूर झाला आहे.
नव्या आराखड्यानुसार पवना नदीवरील मुख्य पूल १२ मीटर रुंदीचा व ९० मीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी १६ कोटी ५० लाख खर्च येणार आहे. मामुर्डीकडील १२ मीटरचा जोड रस्ता ३०० मीटर लांब आहे. त्यासाठी २२ कोटी ५० लाख खर्च आहे. सांगवडेकडील १२ मीटरचा जोड रस्ता १३० मीटर लांब आहे. विद्युत दिव्याचे खांब बसविण्यासाठी १ कोटीचा खर्च आहे. असा एकूण ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.


















