न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२३) :- येत्या शनिवारी (दि. २८) कोजागरी पौर्णिमा असली तरी या रात्री चंद्रग्रहण आहे. ग्रहणकाळात अन्न सेवन करु नये, अशी धार्मिक मान्यता असल्याने ग्रहण काळात दूध प्राशन करावे की नाही? असा प्रश्न कोजागरी साजरा करणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
कोजागरी पौर्णिमेला रात्री दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते व मध्यरात्री १२ वाजता ते प्राशन केले जाते. यंदा २८ तारखेला पौर्णिमा आहे. मात्र, त्याच रात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ग्रहण मध्यरात्री १.०५ वाजता लागणार असले तरी ग्रहणाचे वेध शनिवारी (दि. २८) दुपारी ३.३० वाजतापासून लागतील. पहाटे २.२३ वाजता ग्रहण मोक्ष होईल.
कोजागरी पौर्णिमा साजरी करताना दूध प्राशन करावे की नाही? याबाबत अनेक मत-मतांतरे आहेत. शहरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दूध वाटपाशिवाय हा कार्यक्रम कसा होऊ शकेल? आणि समजा दुसऱ्या दिवशी आयोजित केला, तर त्याला किती नागरिक उपस्थित राहतील, अशी भिती आयोजकांना सतावत आहे.