न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२३) :- रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अंतर्गत बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध विभागांमध्ये सहज उभारणी करता येतील अशा पोर्टेबल शाळा उभारण्यात येत आहेत. शहरामध्ये आलेल्या निर्वासित कुटुंबीयांच्या मुलांसाठी ही सोय करून त्यांना एक सुजाण व जबाबदार नागरिक बनवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तापकीर वस्ती, भोसरी येथे या हॅपी स्कूलचे उद्घाटन रविवारी (दि.२९) करण्यात आले.
क्लबचे माजी अध्यक्ष रोटरीयन संजय प्रधान यांच्या पुढाकाराने शहरांमध्ये अशा हॅपी स्कूल सुरू करण्यात येत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष डॉ. मनीष फरांदे होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे, क्लबचे ज्येष्ठ सदस्य नरेंद्र सेठी, अभिजीत शिंदे, सदानंद नायक, आनंद संपत, सूर्यकांत जाधव, आनंद संपत, कुशल शहा, रोहन रोकडे, जनसेवा फाउंडेशनच्या शिक्षिका दीपिक्षा चौबे व ५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
मोशी येथील रस्त्यांवर पालात राहणार्या मुलांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली आहे. या हॅपी स्कूलचे उद्घाटन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले की, शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. कोणताही घटक त्यापासून वंचित राहू नये, यासाठी भटक्या विमुक्त वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करून रोटरी क्लब व जनसेवा फाउंडेशन करीत असलेले कार्य मोलाचे आहे.
आकाश काळोखे यांनी शाळेसाठी त्यांच्या मालकीची जागा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमास पुण्यातील जनसेवा फाउंडेशने मानधनासह शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, कविता व भाषणे म्हणून दाखवली. रोटरी क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. श्रीकृष्णानंद राम मारुती विद्याश्रम संस्थेतर्फे मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यानिमित्त वृक्षारोपणही करण्यात आले. माजी अध्यक्ष संजय प्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त केक व खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.