न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने खासगी चारचाकी वाहनांसाठी नवीन ‘एलई’ ही मालिका सुरू केली जाणार आहे. आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरून राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरून हवा असल्यास त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी अडीचच्या दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा लागणार आहे. चारचाकी वाहन क्रमाकांची यादी २ नोव्हेंबर रोजी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.
अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रकमेचा एकच धनाकर्ष (डीडी) २ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करण्याची सूचना आरटीओने केली आहे. त्याच दिवशी दुपारी साडे तीन वाजता लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरित केला जाणार आहे.
अन्यथा नोंदणी क्रमांक होणार रद्द
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी सादर करावयाचा आहे. अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होणार आहे. भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे. प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नसल्याची माहिती आरटीओने दिली आहे.














