न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड मार्गे जाणाऱ्या पुणे-भुसावळ रेल्वेचा मार्ग बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे आता दौंडमार्गे भुसावळला सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या १८ वर्षांपासून पुणे- भुसावळ रेल्वेचा प्रवास सुरू होता. पुण्यावरून दुपारी ११ वाजून ४० मिनिटांनी ही रेल्वे सुटायची. त्यानंतर चिंचवड, लोणावळा, कर्जत, पनवेल, उरण, कल्याणमार्गे नाशिकला ही रेल्वे जात होती. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना विशेषत: व्यापाऱ्यांना या रेल्वेसेवेचा फायदा होता. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत १ नोव्हेंबर २०२० पासून ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
रेल्वे सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकर साततत्याने पाठपुरावा करत होते. आता ही सेवा पुन्हा सुरू होत आहे परंतु चिंचवडऐवजी दौंडमार्गे ही सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे पिंपरी- चिंचवडकरांच्या पदरी निराशा आली आहे.
” पुणे भुसावळ ही रेल्वे चिंचवड मार्गे लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण मार्गे जात होती. आता त्यामध्ये बदल करून दौंड मार्गे आमरावती अशी धावणार आहे. चिंचवडकरांसाठी एक रेल्वे गाडी कमी झाली आहे. बंद पडलेली ही रेल्वे सुरू करण्याची मागणी करत होतो. उलट तिचा मार्ग बदलण्यात आला.
– इकबाल मुलाणी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघ.