- अशा फसव्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा; अन्यथा बँक खातं होईल रिकामं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२३) :- ‘पॅनकार्ड अपडेट करा; नाहीतर तुमचे अकाउंट बंद होईल’ अशा आशयाचा टेस्ट मॅसेज वीस वर्षीय महिलेच्या मोबाईलवर आला होता. तो मॅसेज ओपन केल्यानंतर त्यामध्ये आलेली एक लिंक महिलेने ओपन केली. त्यावर एका बँकेचे होम पेज ओपन होऊन होम पेजवर पॅनकार्ड अपडेट म्हणून टाईटल आले. त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड हे नंबर सबमीट करण्याचा मॅसेज होता. महिलेने आधारकार्ड व पॅनकार्ड नंबर सबमीट केला असता तो फेल गेला. त्यावेळी महिलेच्या मोबाईलवर ओ.टि.पी.नंबर आला व तिच्या अकाऊंटमधुन पैसे डेबिट झाल्याचा मॅसेज आला.
त्यावेळी मोबाईलमध्ये बँकेचे अॅप ओपन केले असता त्यांना बँक खात्यावरून प्रथम १,९९,९६८ रुपये व ट्रान्झॅक्शन आय. डी. द्वारे १,९८,९६५ रुपये असे एकुण ३,९८,९३३ रुपये डेबिट झाल्याचे दिसले. अशा प्रकार अनोळखी इसमाने ऑनलाईन माध्यमातून महिलेची एकूण ३,९८,९३३ रुपयांची आर्थीक फसवणुक केली आहे. ही फसवणुकीची घटना (दि. ५/१०/२०२३) रोजी रात्री ८.०० च्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.
महिलेने अनोळखी इसमाच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी ५७२/२०२३, भा.दं.वि. कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा अधिनियम (अॅमेंडमेन्ट) २००८ कलम ६६ (डी) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि (गुन्हे) तांबे पुढील तपास करीत आहेत.