- बेकायदेशीर स्टॉलवर कारवाईचा इशारा; परवानगीसाठी आहे इतके शुल्क…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या फटाका विक्रीसाठी देखील तयारी सुरू झाली आहे. शहरात दरवर्षी अनेक स्टॉल परवानगी न घेताच उभारले जातात. परंतु यावर्षी महापालिकेने कडक धोरण राबविण्याचा निश्चिय केला आहे. महापालिकेची परवानगी घेऊनच स्टॉल उभारावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव, नवरात्र उत्सव झाल्यानंतर आता नागरिकांना दिवाळी या सर्वात मोठ्या सणाची उत्सुकता लागली आहे. दि. ९ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात फटाके स्टॉल उभारले जातात. या फटाका स्टॉलसाठी महापालिकेच्या अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून शुल्क आकारून परवानगी देण्यात येत आहे. तसेच मोकळ्या जागेवर परवानगी दिली जात नसल्यानेही अग्रिशमन विभागाकडून सांगण्यात आले.
स्टॉल उभारताना ही घ्या काळजी…
आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी.
फटाका स्टॉल परिसरात, बिडी, सिगारेट पेटवू नये.
स्टॉल परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवू नये.
फटाका स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे.
१ ते ५ हजार लिटर पाण्याची व्यवस्था ठेवावी.
तर बेकायदेशीर स्टॉलवर कारवाई…
महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. मंगळवारअखेर शहर परिसरातून फटाका स्टॉल उभारण्यासाठी ६० जणांनी अर्ज केले होते. त्यांना अग्निशामक विभागाने परवानगी दिली आहे. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात बेकायदेशीर फटाका स्टॉल उभारल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी बेकायदेशीर रित्या स्टॉल उभारून फटाके विक्री केल्याचे दिसून येते. आगीसारख्या भीषण घटना घडू नये, याकरिता प्रशासन यंदा सतर्क असून बेकायदेशीर स्टॉलधारकांवर कारवाई करणार आहे.
अग्निशामक विभागाने १ हजार रूपये परवानगी शुल्क आकारून ६० फटाका स्टॉलधारकांना परवानगी दिली आहे. व्यावसायिकांनी फटका स्टॉल उभारण्यापूर्वी महापालिकेची रितसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे.
– अनिल डिंबळे, प्रभारी अधिकारी अग्रिशामक दल…














