- मेट्रोचे काम तब्बल तीन ते चार वर्षे चालणार..
- महामेट्रो, महापालिका व वाहतूक पोलिसांसमोर मोठा प्रश्न?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी ते निगडी या ४.४ किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रोचे प्रत्यक्ष काम पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल. वेळेत काम पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाल्यास निगडी ते स्वारगेट असा प्रवास शहरवासीयांना चार वर्षांनंतर म्हणजे जून २०२७ पासून शक्य होईल. या प्रकल्पाच्या ९१० कोटींपैकी सर्वाधिक २५९ कोटी ८६ लाख रुपये खर्चाचा हिस्सा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उचलला आहे.
मूळ आराखड्यात निगडीपर्यंतचा मार्ग न दाखविल्याने त्या मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश झाला नाही. केंद्राने त्याबाबत उत्सुकताही दाखविली नाही. शहरात पिंपरीपर्यंतच मेट्रो धावू लागल्याने निगडीपर्यंत मेट्रो हवी, नागरिक व लोकप्रतिनिधीच्या अशा मागणीच्या रेट्यामुळे केंद्राने निगडीपर्यंतच्या मार्गास अखेर नुकतीच अंतिम मंजुरी दिली.
मार्गास मंजुरी मिळणार या भरवशावर महामेट्रोने निविदेची पूर्व तयारी करून ठेवली होती.निविदेची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करून चौथ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०२४ ला प्रत्यक्ष काम सुरू होईल, कामाची मुदत ३ महिने आहे. अडथळा न येता काम पूर्ण झाल्यास कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) मंजुरीसाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर शहरवासीयांना निगडीपासून थेट स्वारगेटपर्यंत तसेच, रामवाडी व वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल.
केंद्राने २० ऐवजी १० टक्के म्हणजे निम्माच निधी दिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने उर्वरित निधी देण्यास सहमती दिली. महापालिका १२१ कोटी ९७ लाख रूपये म्हणजे सर्वाधिक १८.२ टक्के हिश्श्याची रक्कम देणार आहे; तसेच विविध ठिकाणच्या जागा, बाधित ठिकाणच्या रहिवाशांना स्थलांतरित करणे, महापालिकेचे विविध कर आदी असे एकूण १३७ कोटी ८८ लाख रुपयांची मदत महापालिका करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या हिश्शाच्या तुलनेत ही सर्वाधिक रकम आहे. केंद्र शासन ६७ कोटी २ लाख (१० टक्के). आणि राज्य शासन ७९ कोटी ८ लाख (११.८ टक्के) असा आर्थिक हिस्सा आहे. तर ४०२ कोटी ११ लाखांचे (६० टक्के) कर्ज महामेट्रो काढणार आहे.
सेवा रस्त्यावरून मेट्रोची मार्गिका तयार केली जाणार आहे. हे काम साडेतीन वर्षे चालणार आहे. निगडी ते मोरवाडी चौकापर्यंत सेवा रस्ता अरुंद आहे. विशेषतः निगडी भक्ती-शक्ती चौक, टिळक चौक, बजाज ऑटो कंपनी, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन या ठिकाणी नेहमीच रहदारीचा खोळंबा होता. मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटर मार्गावर ताण वाढणार आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी महामेट्रो, महापालिका व वाहतूक पोलिसांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावे लागतील.
भक्ती-शक्ती चौकात रोटरी पूल उडाणपूल व ग्रेडसेपरेटर आहे. त्यामुळे या चौकात पुलांची व जोडरस्त्यांची संख्या मोठी आहे. मेट्रोच्या मार्गिकमुळे आणखी एका पुलाची येथे भर पडणार आहे. त्यामुळे नाशिक फाटा चौकाप्रमाणे या चौकात पुलाचे जाळे दिसेल.
मेट्रोचे चिंचवड स्टेशन पिंपरी पोलिस ठाणे येथे होणार आहे. तेथून चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ आहे. मेट्रो रेल्वे व बीआरटी मार्ग येथे जोडला जाणार आहे. तसेच, निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे बीआरटीचे स्थानक आहे. बीआरटी स्थानकाला मेट्रो स्टेशन जोडले जाणार आहे. तेथून किवळे बीआरटी मार्गावर तसेच तळेगावच्या दिशेने बस आहेत. त्या ठिकाणी मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब तयार केले जाणार आहे.
ठरलेल्या मुदतीमध्ये काम करण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गावर टप्प्याटप्प्याने चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर कमिशनर ऑफ मैट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) अंतिम मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर मार्ग खुला करण्याबाबत केंद्र शासनाला कळविले जाईल. केंद्राच्या परवानगीने हा मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल.
दरम्यान, खराळवाडीपासून ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंतच्या सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) व बीआरटीएस मार्गावर उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो मार्गिका तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे उडाण पुलापासून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यच्या सेवा रस्त्यावर मेट्रोमार्गिका उभारली जाईल. ग्रेडसेपरेटर मार्गावर तीन स्टेशनच्या प्रवेशद्वारासाठी पदपथावरील चौक असल्याने सेवा रस्त्याचा पर्याय महामेट्रोने निवडला आहे. प्रत्येक स्टेशनला चार प्रवेशद्वार महापालिकेने आपल्या जागा मार्गिकसाठी आणि स्टेशन तसेच उभारण्यासाठी दिल्या आहेत. या मार्गावरील पिंपरी-चिंचवड शहरातील मिसिंग भाग असलेल्या पिंपरी ते निगडी या मार्गवर मेट्रो होत आहे. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक तसेच, जागा व इतर बाबतीमध्ये सर्वाधिक हिस्सा आहे. या मार्गावरील सर्व जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत. काम करण्यास महापालिका महामेट्रोस सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. त्यामुळे काम विना मुदतीमध्ये पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना निगडी, आकुर्डी, चिंचवड व शहरातील इतर भागांतून प्रवास करणे तसेच, पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.














