- पं. अजित कडकडे यांच्यासह सुप्रसिद्ध गायकांच्या भावपूर्ण गीतांनी ‘उन्नती’ची ‘दिवाळी पहाट’ रसिकांना भावणार..
- सुरेल मैफिलीचा आनंद घेण्यासाठी उद्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित रहा – डॉ. कुंदाताई संजय भिसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२३) :- पिंपळे सौदागरमध्ये उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने उद्या रविवार, सोमवार आणि मंगळवार (दि. १२, १३ आणि १४ नोव्हेंबर) रोजी तीन दिवसीय ‘स्वरामृत दिवाळी पहाट’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन लिनियर गार्डन, गोविंद यशदा ‘चौक, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ केले आहे, अशी माहिती उन्नती सोशल फाउंडेशन तथा भारतीय जनता पार्टी, चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी दिली आहे.
दिवाळी आणि फराळाच्या अतूट नात्याप्रमाणेच काही वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी ‘दिवाळी पहाट’ या सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळते आहे. पिंपळे सौदागरमध्येही ‘दिवाळी पहाट’ ही सांस्कृतिक सप्तसुरांच्या मैफिलीने रंगदार होत आहे.
डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, यंदाच्या दिवाळीतसुद्धा उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमात सुप्रसिध्द गायकांची भक्तीगीतं, भावगीतं, तरुणाईला भावणारी गीतं आणि जेष्ठांना चिरतरुण बनविणाऱ्या गीतांचा आस्वाद घेत दिवाळीला सुरुवात होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत असून यंदा सहाव्या वर्षी देखील पिंपळे सौदागरवासीयांसाठी दिवाळीनिमित्त दिवाळीची पहाट सुरमयी करण्यासाठी सुरांची रेलचेल घेवून आलो आहोत. यंदाच्या दिवाळीत रविवारी (दि. १२) रोजी पहाटे ०५:०० ते ८.०० वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गांधी (फत्तेशिकस्त, फर्जंद, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार), प्रसिद्ध गायक पंडित राजा काळे, अमिता घुगरी हे आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसेच सोमवारी (दि. १३) रोजी पहाटे ५.०० ते ८.०० वाजता संपन्न होणाऱ्या सुरांच्या मैफिलीत पिंपळे सौदागर परिसरात प्रथमच सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे (पं. जितेंद्र अभिषेकी बुवा यांचे शिष्य) आपल्या आवाजाने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकतील. अखेरच्या दिवशी मंगळवार (दि. १४) रोजी अंजली गायकवाड आणि नंदिनी गायकवाड यांच्या सुरेल गीतांनी दिवाळी पहाटचा समारोप होईल. परिसरातील रसिकांनी या सुरेल मैफिलीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी केले आहे.
–


















