न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२३) :- दिवाळी हा दिव्यांचा उत्सव, तिमिरातून तेजाकडे जाण्याचा हा सण आहे. मोठ्या उत्साहात हा सण घरोघरी साजरा होतो. नेहमीप्रमाणेच यंदाही कामानिमित्त इतरत्र स्थलांतरित झालेल्या बांधकाम मजुरांच्या मुलांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी पुढाकार घेतला.
रस्टन कॉलनी मित्र मंडळ नवरात्र उत्सव यांच्या वतीने रावेत येथील मस्ती की पाठशाला या बांधकाम मजूर मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त रविवारी (दि. १२) रोजी फटाका किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी शहर संघटक संतोष सौंदणकर, मंडळाचे अध्यक्ष मयूर जयस्वाल, जेष्ठ संचालक सुभाष मालुसरे, मंडळाचे सदस्य महेश शर्मा, सुनील ढमाले, सतीश पोफळे, मस्ती की पाठशाला या शाळेच्या संचालिका प्राजक्ता रुद्रवार आदी उपस्थित होते.
फटाके पाहून शाळेतील मुले खुश झाली. त्यांच्या चेहर्यावर विलोभनीय आनंद पाहायला मिळाला. हा उत्साह पाहून मनाला समाधान वाटले, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. उपस्थितही भारावून गेले होते. मुलांची दिवाळी गोड झाली. शाळेच्या वतीने मान्यवरांचे आभार मानण्यात आले.













