- समस्यांची दखल घ्या – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल) :- भोसरी एमआयडीसी परिसरात रस्त्यांच्या समस्यांमुळे रोज अपघात घडत आहेत. या परिसरात पाइपलाइनची कामे झाल्यानंतर महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती अद्याप केलेले नाही. या समस्यांवर फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्र काढले आहे.
यात त्यात म्हटले आहे की, ”काही ठिकाणी पूर्वी केलेल्या दुरुस्त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. परिसरात अवजड वाहने, कामगार वर्गाची वर्दळ व रात्री उशिरा सुटलेला कामगार वर्ग रस्त्याने जात असताना वारंवार अपघात घडत आहेत.
टॉवर कंपन्या, गॅसलाईन, पाणी व विद्युत लाईनसाठी अनेकदा रोड उखडलेले आहेत. परंतु, त्याची दुरुस्ती अद्यापपर्यंत व्यवस्थितरित्या झालेली नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर दुरुस्ती करणे शक्य होत नाही. फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांच्याकडे अनेक उद्योजक व कामगारांच्या तक्रारी आल्या आहेत.
परिसरात भंगार वाहतूक करणारी वाहने जात असतात. अवजड वाहनांच्या ये-जा करण्यामुळे रस्त्यावर लोखंडाची बर पडते. त्यामुळे उन्हाळ्यात गाड्यांचे पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर खडी पसरल्यामुळेही अनेक गाड्या घसरतात. महानगरपालिकेने समस्यांची दाखल घेत, त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी या पत्रकात केली आहे











