- नाकाबंदी अॅपद्वारे शहरातील वाहनांची होणार तपासणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड औद्योगिक शहरामध्ये मोठया प्रमाणात परराज्यातून तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून नोकरी व रोजगारनिमित्त अनेक नागरिक स्थायिक झालेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दळणवळणासाठी मोठया प्रमाणात वाहने वापरली जातात. त्यामध्ये दुचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहन चोरी तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर शहरात वाढला आहे. अशा घटनांना प्रतिबंध करणे व त्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेमार्फत ई-चलन कार्यप्रणाली अंतर्गत तयार केलेल्या नाकाबंदी अॅपद्वारे वाहन तपासणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेअंतर्गत १४ वाहतूक विभागातील प्रत्येक ०२ पोलीस अंमलदार यांची एक टिम अशा एकुण १४ टिम व पिंपरी-चिंचवड वाहतूक नियत्रंण कक्ष यांच्या ०६ टिम अशा एकुण २० टिम तयार करण्यात येत आहेत. सर्व टिम हया पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शॉपिंग मॉल, शाळा, उड्डाणपुलाखालील पार्किंग, सोसायटी पार्कीग, बेवारस वाहने, इ. ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी नाकाबंदी अॅपद्वारे चेकींग करुन जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करुन वाहन चोरी/ बनावट नंबर प्लेट वापरणे इ. घटनांचा शोध घेणेकामी व प्रतिबंध करणेकामी प्रयत्न करणार असुन यामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट इत्यादी गुन्हयांना प्रतिबंध होईल.
हा उपक्रम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा बापू बांगर व वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांच्या मार्फत “वाहन तपासणी उपक्रम” दिनांक ०१.१२.२०२३ रोजी पासुन सुरू करण्यात येत आहे.