- तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, महा ई-सेवा केंद्राच्या प्रतिनिधींची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- रहाटणी येथे मंगळवारी सकाळी नऊ वाजता ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थीना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
संजय गांधी निराधार योजना समिती चिंचवड विधानसभा मतदासंघ, पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार कार्यालय, मुळशी तहसीलदार कार्यालय, संजय गांधी निराधार योजना विभाग, पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार अश्विनी जगताप, तहसीलदार अर्चना निकम, रणजित भोसले, अमोल कदम, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, गोपाळ माळेकर उपस्थित राहणार आहेत.
संजय गांधी निराधार योजना समितीतर्फे आतापर्यंत विविध ठिकाणी ११ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी होणाऱ्या शिबिरात आयुष्मान भारत कार्डही देण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजना समितीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र माने, सदस्य संजय मराठे, अदिती निकम, दिलीप गडदे, राजेंद्र पाटील यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.
शिबिरामध्ये एकाच छताखाली तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, महा ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. एका दिवसात पेन्शनसह इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे.














