- लोणावळ्यात होणार पर्यटनाचा थरार; प्रकल्पाला अंशतः मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२३) :- लोणावळा परिसर पर्यटनक्षेत्र विकासासाठी लोणावळ्यापासून १५ किलोमीटर अंतरावरील लायन्स व टायगर पॉइंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
मावळ तालुक्यातील वन विभागाच्या मौजे आतवन येथील राखीव वन गट नं. १६६ मधील आठ हेक्टर क्षेत्रात हा स्काय वॉक पीएमआरडीएमार्फत विकसित केला जाईल. त्यासाठी पर्यटन विकास विभागाकडून वित्त पुरवठा केला जाणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २१ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत चर्चा झाली होती. या प्रकल्पाला राज्य सरकरारने तत्त्वतः मंजुरी दिली असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे पवार यांनी बैठकीत सांगितले होते. मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास होत आहे. लोणावळा परिसराचा समावेश आहे. स्काय वॉक प्रकल्पामुळे लोणावळ्यातील पर्यटकांच्या संख्येत मोठी भर पडणार आहे. येथील अर्थकारणाला चालना मिळण्यास मदत होईल.
२००० फूट खोल दरीवर काचेचा पूल…
पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा परिसराची ओळख आहे. या पर्यटनस्थळाचा विकास करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्काय वॉक उभारण्यात येईल. त्यामुळे दरीवर काचेच्या पुलावरून चालण्याचा अन हवेतून झेपावण्याचा आनंद घेता येणार आहे. स्काय वॉक प्रकल्पामुळे लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर पॉईंटच रुपडे पालटणार आहे. दोन हजार फूट खोल दरीवर स्काय वॉक उभारून हे दोन्ही पॉईंट जोडले जाणार आहेत. जिप लाईनद्वारे हवेतून झेपावण्याचा थरार अनुभवता येणार आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह राज्यातील व परराज्यातील पर्यटकांसाठी ‘स्काय वॉक’ हा प्रकल्प पर्यटनाचा थरार देणारा ठरेल. यात पर्यटकांच्या चालना सुरक्षेला अधिक प्राधान्य राहणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे महानगर क्षेत्रातील पर्यटनाला मिळण्यास मदत होणार आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए…