न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२३) :- आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी पिंपरी येथील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
आपचे नेते सुनील शिवशरण ह्यांनी अभिवादन करताना सांगितले की, आज ६ डिसेंबर असून आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. हा दिवस देशभरात भीम अनुयायींसाठी अत्यंत दुःखाचा मानला जातो. १९५६ मध्ये याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झालं. आणि संपूर्ण दलित समाज पोरका झाला. जगातील एकमेव नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांना संपूर्ण जगामध्ये पूजलं जातं आणि ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये जन्मले हा भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हा दिवस कोलंबिया आणि कॅनडा या देशात ‘अंबेडकर समानता दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून आप सरकार प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला मोफत शिक्षण व मोफत आरोग्य देते. समाजातील शेवटच्या व्यक्तीला शिक्षण देणे हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली असेल अशी भावना सुनील ह्यांनी यावेळी व्यक्त केली.
मीनाताई जावळे ह्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना सांगितले की, बाबासाहेब नेहमी बोलत की, बदल घडावा असे प्रत्येकाला वाटते. पण बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हावी, असे कोणाला वाटत नाही. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध बदलाची सुरुवात स्वतःपासून करा, असे मार्गदर्शन करतात. स्वतः मध्ये बदल घडू लागले, की आपल्या सभोवताली बदल घडू लागल्याचे आपल्याला जाणवू लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील भगवान बुद्धांचे विचार अनुसरून प्रगतीचा मार्ग अवलंबिला आणि आपले ध्येय गाठले. जगाला प्रेरणा दिली. बाबासाहेबांनी दिलेला जातींअंताचा लढा, समता, बंधुता, न्याय ह्यांचा विचार जगाचा कानाकोपऱ्यामध्ये त्याचा प्रचार प्रसार करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असे मीनाताई ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ह्यावेळी सुनील शिवशरण, मीनाताई जावळे, प्रकाश हगवणे, प्रशांत कोळवले, चंद्रमणी जावळे हे पदाधिकारी उपस्थित होते.












