- महापालिकेचा अंदाजपत्रकातील विकासकामे संपविण्यावर जोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२३) :- पावणेदोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. यामधील चालू आर्थिक वर्षातील साडेसात महिन्यांत स्थापत्य विभागाची ५० टक्के रक्कम विविध विकासकामांवर खर्ची झाली आहे. आयुक्त शेखर सिंह यांचे ‘प्रशासकराज’ जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे सहा हजार कोटींचे अंदाजपत्रक आहे. या अंदाजपत्रकात सर्वाधिक तरतूद स्थापत्य विभागासाठी ११४६ कोटी ८७ लाख १३ हजार रुपयांची करण्यात आली आहे.
होणाऱ्या विकासकामांमध्ये प्रामुख्याने सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, खडी-मुरुमाचे रस्ते, जलवाहिन्यांची कामे, पावसाळी गटार, सांडपाणी नलिकांची कामे, पदपथ, नवीन उद्याने विकसित करणे अशा विविध महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. त्यातही सर्वाधिक कामे महापालिका स्थापत्य विभागाच्या माध्यमातूनच केली जातात, स्थापत्य विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील १ एप्रिल ते १६ नोव्हेंबर या साडेसात महिन्यांत महत्त्वाच्या तीन उड्डाणपुलांच्या कामासह रस्त्याच्या कामासाठी मोठी तरतूद खर्ची केली आहे. या विभागासाठी ११४६ कोटी ८७ लाख १३ हजार रुपयांची तरतूद आहे. या तरतुदीपैकी ५७६ कोटी ८३ लाख रुपये विकासकामांवर खर्च केले आहेत, तर ५७० कोटी ४ लाख रुपये खर्च करणे बाकी आहे.
उर्वरित ५० टक्के रक्कम साडेचार महिन्यांत खर्ची करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारी अखेर किवा मार्च २०२४ मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामे मंजूर करण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी मिळू शकतो. या कालावधीत महत्त्वाच्या विकासकामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
आर्थिक वर्षात स्थापत्य विभागाकडे ५७० कोटी ४ लाख रुपये शिल्लक आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून उर्वरित तरतूद विविध विकासकामांवर खर्च करण्याचा प्रयत्न असणार आहे.
– मकरंद निकम, शहर अभियंता….













