न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२३) :- देशाच्या राजधानीत अतिशय सुरक्षित, अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या तसेच अतिमहत्वाचे क्षेत्र असणाऱ्या संसदीय परिसरात काही तरुणांनी धुराच्या कांड्या फोडून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. अश्या घटनेत आपल्या राज्यातील लातूर जिल्ह्यातील छोट्याश्या गावातील एक तरुण अमोल शिंदे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा तरुण तिथपर्यंत पोहचतो व नियमबाह्य कृत्यात सहभागी होतो हे राज्याच्या दृष्टीने दुर्दव्याची घटना आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च पिठात, असा निषेध करणे नियमबाह्यच, परंतु आपल्या राज्यातील म्हणजेच मराठवाड्यातील “तरुण” हे टोकाचे पाऊल का उचलतो? हे तपासणेही गरजेचे. सर्व स्तरातील घटकांना त्यामुळे चिंतन करण्याची वेळ आलेली आहे, असे मत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृतीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
धोकादायक व बेकायदेशीर पद्धतीने आंदोलन करणे हे चुकीचेच ठरते. अश्या पद्धतीने आपले म्हणणे प्रदर्शित करणे म्हणजे देशाच्या सर्वोच्च लोकशाहीला गालबोट लावणे. सध्या राज्यात आर्थिक विषमतेमुळे व बेरोजगारीच्या परस्थितीमुळे मराठा आंदोलन चिघळलेले आहे. सनदशीर मार्गाचा वापर करून सुरू असलेले हे आंदोलन देशात चर्चेचा विषय ठरत आहे. हे आंदोलन हे मराठवाड्यातूनच सुरू झालेले आहे. घडलेल्या घटनेची तारसुद्धा मराठवाड्यातील लातूरशी जुळलेली आहे. एकीकडे शांततेत सुरू असलेले आंदोलन व एकीकडे एक बेरोजगार तरुण नियमबाह्य पध्दतीच्या निषेध कृत्यात सामील होतो हे सद्य परस्थितीतील आपल्या राज्यात निर्माण झालेले विदारक सत्य आहे. ह्यामुळे मराठवाडयातील आर्थिक विषमतेचा ग्राफ हा तुलनेने राज्यातील इतर भागापेक्षा खालावला असल्याचे दर्शवत आहे.
गरिबी व त्यातच हाताला नसलेले काम यामुळे बहुतांशी तरूण वर्ग हताश झालेला दिसून येत आहे. अश्यामुळे अनेक तरुण हिंसात्मक मार्गाकडे वळत आहे. राज्यातील स्थिरतेला त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. ह्या घटनेकडे राज्यातील बुद्धीजीवी, सामाजिक तसेच राजकीय मंडळींनी आता लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.अश्या घटना भविष्यात घडू नये ह्यासाठी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांनी योग्य उपाय योजना राबविण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक अभ्यासगट व समुपदेशक गट राज्यपातळीवर नेमणे अत्यावश्यक आहे. ह्या महत्वपूर्ण सुचनेकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने पहावे अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.















