- सर्वेक्षण अहवालातील सूचनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- चाकणच्या वाहतूककोंडीबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दोन महिन्यांपूर्वी संबंधित अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महामार्गाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, अजूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसल्याने वाहतूककोंडी ‘जैसे थे’ राहिली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त बापू बांगर, चाकण नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल कदम, एमएसईडीसीएल अधिकारी व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सदस्य यांच्या अभ्यास गटाने सर्वेक्षण करून पुणे-नाशिक महामार्गावरील बंगला चौक मोठा करून डांबरीकरण करणे, तळेगाव चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी पादचारी पूल तयार करणे, येथील नाशिककडे व पुण्याकडे जाणाऱ्या बसचा थांबा १०० मीटर पुढे नेणे, पुण्याकडील बसथांब्याजवळ साचत असलेले पाणी ड्रेनेजद्वारे काढून देणे, पुण्याहून महाळुंगेकडे जाणाऱ्या वळणावर असलेले वीज रोहित्र हटवणे, चाकणहून पुण्याकडे जाताना वळणालगतचे ड्रेनेज रस्त्याला समतल करणे, मुटकेवाडी चौक ते आंबेठाण चौक सेवा रस्त्याचे दुभाजक काढणे, आंबेठाण चौक मोठा करून डांबरीकरण करणे, येथील तीनही वळणांवरील विजेचे खांब काढणे, पुण्याकडून आंबेठाणकडे जाणाऱ्या वळणावर असलेला नाला बंदिस्त करणे, चाकण गावातून पुण्याकडे वळताना असलेले विजेचे खांबही काढून चौकाचे रुंदीकरण करणे, तसेच येथील नाला बंदिस्त करून त्यावर आरसीसी बांधकाम करून तो समतल करणे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल उभारणे, तसेच तळेगाव चौकातील मजूर अड्डा चाकण मार्केट यार्डजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत नेण्याच्या महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. अभ्यास गटाने पाहणी करूनही प्रशासनाकडून सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला आहे.
चाकणची वाहतूककोंडी कमी करण्यासाठी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. फक्त चाकण तळेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.
– वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक, चाकण वाहतूक शाखा…चाकण भागातील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असलेल्या मार्गावरील बहुतांश कामे करण्यात आली आहेत, राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिक हा नॅशनल हायवेकडे आहे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी अहवाल आमच्याकडून पाठवण्यात आला आहे.
– राहुल कदम, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग…













