न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२३) :- मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात करणार आहेत. येत्या शनिवारी (दि. ६) सायंकाळी साडेचार वाजता किवळे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा होणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे राज्याचा दौरा करत आहेत. शिवसेनेचे खासदार असलेल्या, मागीलवेळी शिवसेनेने निवडणूक लढविलेल्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे जाणार आहेत. त्यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा किवळेतील मुकाई चौकात शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.











