न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२४) :- मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची मुळशी येथे बदली झाली आहे; परंतु अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नसल्याने भागवत यांच्याकडे मावळचीही जबाबदारी राहणार आहे.
प्रशासकीय कारभार सुरू असलेल्या मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत यांची मुळशी येथे बदली झाली; परंतु त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकारी नियुक्त झाले नसल्याने नवीन अधिकारी येईपर्यंत भागवत यांच्याकडेच मावळचीही जबाबदारी राहणार आहे. तसेच, सहायक गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांचीही बदली झाल्याने पंचायत समितीचे प्रमुख कारभारीच नसल्याने कार्यालयीन नियंत्रणही बिडण्याची शक्यता आहे.
याशिवाय, सर्वांत मोठा विभाग असलेल्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज पाटील हे सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या जागी प्रभारी अधिकारी काम पाहत आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही रितेश मुंढे हे प्रभारी अधिकारी आहेत. तसेच, पंचायत विभागात तीन विस्तार अधिकारी आवश्यक असताना एकच विस्तार अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे दोन जागा रिक्त आहेत. तर, शिक्षण विभागात पाचपैकी दोन विस्तार अधिकारी असून तीन जागा रिक्त आहेत. एकंदर, आधीच प्रशासकीय कारभार असलेल्या मावळ पंचायत समितीमध्ये जबाबदार अधिकारीच नसल्याने कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.