आ. सुनिल शेळकेंच्या लक्षवेधीवर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२४) :- मावळ तालुक्यात वीस पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहप्रकल्पांची पीएमआरडीए मार्फत आज मंगळवारी (दि. १६) जानेवारीपासून पाहणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांमध्ये संबंधित बिल्डरकडून सोसायटीतील नागरिकांना पाणी, वीज, रस्ता, सांडपाणी व्यवस्था इ. भौतिक सुविधा दिल्या आहेत की नाही याची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
पीएमआरडीए हद्दीमधील गृह प्रकल्पांमध्ये झालेली अनियमितता तसेच या प्रकल्पांद्वारे नदीमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. १५) पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पीएमआरडीए मार्फत मावळ तालुक्यातील वीसपेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृह प्रकल्पांची १६ ते २६ जानेवारीदरम्यान पाहणी करण्यात येणार असून यामध्ये संबंधित विकसकांकडून सोसायटीधारकांना मूलभूत सुविधा दिल्या आहेत की नाही याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या बैठकीत पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार आहे.
मावळ तालुक्यात मोठे गृहप्रकल्प, टाऊनशिप उभारल्या जात आहेत. संबंधित बिल्डर्सकडून रहिवाशांना रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्था इत्यादी सुविधा देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिकांची मुलभुत सुविधा अभावी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येते. तसेच या गृहप्रकल्पांमधील सांडपाणी थेट इंद्रायणी व पवना नदी पात्रात सोडले जाते. तरीदेखील अशा प्रकल्पांना पूर्णत्वाचा दाखला कसा काय मिळतो याबाबत आमदार सुनिल शेळके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर आवश्यक नियम व शिफारशी करुन त्याचा सर्वसमावेशक अहवाल शासनास सादर करण्यासाठी गठीत केलेल्या समितीकडून उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.