- उर्वरित वारसांना मदत देण्याची प्रकिया सुरू – तहसीलदार निकम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणाऱ्या कारखान्यास आग लागून झालेल्या दुर्घटनेत १४ महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, त्यापैकी पाच मृत महिलांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित वारसांना मदत देण्याची प्रकिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेड झोन हद्दीत विनापरवाना सुरू असलेल्या या कारखान्यास ८ डिसेंबर २०२३ ला स्फोट होऊन आग लागली होती. त्यात १६ जण गंभीर जखमी झाले. त्यातील १४ महिला कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका महिला कामगारावर अमरावती येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमी झालेल्या कारखान्याच्या मालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकाराने प्रत्येकी पाच लाखांची मदत घोषित केली होती. त्यानुसार आवश्यक कागदपत्रे आणि वारसांचे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आली. त्यापैकी पाच मृत महिलांच्या वारसांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच लाखांची रक्कम गेल्या आठवड्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित नऊ महिलांच्या वारसांना मदत देण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या वारसांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येत आहेत. तसेच काही कागदपत्रे अद्याप त्यांनी जमा केली नाहीत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वारसांच्या बँक खात्यात आठवड्याभरात रक्कम जमा होईल.
तळवडे आग दूर्घटनेतील मृत महिलांच्या वारसांकडून अजून काही कागदपत्रे जमा केलेले नाहीत. कागदपत्रे जमा केल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वारसांच्या बँक खात्यात आठवड्याभरात रक्कम जमा होईल, अशी माहिती तहसीलदार अर्चना निकम यांनी दिली.














