- अन्यथा वाहकांवर कारवाई; पीएमपीचा कर्मचाऱ्यांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये प्रवाशांना त्यांच्या जागेवर जाऊन तिकीट देणे बंधनकारक असून ते न दिल्यास वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे. त्याबाबत प्रशासनाने मंगळवारी परिपत्रक काढून प्रवाशांना तिकीट त्यांच्या जागेवर जाऊन देण्याचे आदेश दिले आहेत. पालन न करणाऱ्या वाहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अनेकदा सकाळी आणि संध्याकाळी बसमध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र, दुपारच्या वेळेत अनेकदा गर्दी नसते, बसमध्ये गर्दी नसताना वाहक जागेवर बसून नागरिकांना तिकीट घेण्यासाठी बोलावून घेतात. पण, प्रवाशांच्या जागेवर जाऊन तिकीट देण्याची वाहकांची जबाबदारी असताना ते कंटाळा करतात. त्यामुळे प्रशासनाने अखेर परिपत्रक काढले असून प्रवाशांना तिकीट त्यांच्या जागेवर जाऊन देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच थांबाजवळ आल्यावर बस रस्त्याच्या मध्येच उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. प्रवाशाना देखील रस्त्याच्यामध्ये उतरावे लागते.
ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसमध्ये बसताना आणि उतरताना यामुळे गैरसोयींचे होते. या बाबत वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनाला पत्र दिले आहे. यावर पीएमपी प्रशासनाने सर्व चालकांना बस थांब्याजवळ उभी करण्याचे आदेश दिले असून उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.