- जनजागृतीसाठी माहीती फलकही लावावेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत प्रशासनाच्या सहयोगाने ५ मोठ्या रुग्णालयात स्वस्त जेनेरिक औषधे विक्री केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अगोदर असा प्रयोग जानेवारी २०२२ मध्ये शहरात राबविण्यात आला होता. वायसीएममध्ये त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु योग्य जनजागृती व प्रभावी जाहिरात अभावी कित्येक महिने ते जेनेरिक स्टोअर बंद होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
नॅकोफ इंडिया लिमिटेडच्या वतीने वायसीएमसहित, नवीन जिजामाता हॉस्पिटल, थेरगाव, आकुर्डी, नवीन भोसरी या ठिकाणी लवकरच नागरिकांना स्वस्त औषधे उपलब्ध होण्यासाठी जेनेरिक स्टोअर्स सुरू करण्यात येणार आहेत. अशी औषधे केंद्र सर्व आठही मोठ्या रुग्णालयात सुरू करण्यात यावीत अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात ते म्हणाले, कोरोना काळात महागड्या औषध किमतींमुळे आपल्या शहरात लाखो नागरिकांना चांगल्या स्वस्त उपचारांनपासून वंचित रहावे लागले. त्या काळात योग्य पावले न उचलल्यामुळे कोरोनाच्या दोन लाटामध्यें अनेक शहरवासीयांना स्वस्त औषधे उपलब्ध झाली नाहीत. त्यांच्या कुटुंबियांना कोरोना महामारीत मोठया खर्चास सामोरे जावे लागले. लाखो रुपयांची महागडी औषधें त्या काळात नागरिकांना विकत घ्यावी लागली. त्यामुळे आजचा महापालिका प्रशासनाचा निर्णय योग्य असून पाच ऐवजी सर्व आठही रुग्णालयात स्वस्त जेनेरिक स्टोअर्स सुरू करण्यात यावीत असे आवाहन महापालिका आयुक्तांना करण्यात आले आहे. पाच ऐवजी आठही रुग्णालयात ती आता सुरू करण्यात यावीत. त्याचबरोबर आठही प्रभागातील महापालिकेच्या ३२ दवाखान्यांमध्ये या संदर्भात माहिती फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत. त्यामुळे जनजागृती होऊन शहरातील सर्वच नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. या करिता प्रत्येक दवाखान्यात “जेनेरिक औषध आरोग्य मित्राची” स्वयंसेवक म्हणून नॅकोफ कंपनीने नियुक्ती करावी. खेदाची बाब अशी आहे की आजही जेनेरिक औषधाबाबत म्हणवी तशी जनजागृती अद्याप आपल्या देशात व राज्यात झालेली दिसून येत नाही.













