- महापालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दिली अखेरची डेडलाईन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरीगाव व पिंपळे सौदागर या भागांना जोडणाऱ्या पवना नदीवरील समांतर पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. पुलाचे काम मुदत संपून वर्ष लोटले तरी, पूल तयार होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला तंबी दिली आहे. एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यास बजावले आहे. त्या ठेकेदाराला दररोज ५ हजार रुपये दंड करण्यात येत आहे.
पुलाचे काम अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. १०० मीटर लांबीचा आणि ८ मीटर रुंदीचा हा समांतर पुल आहे. तर ३ मीटरचा पदपथ आहे. त्यासाठी सुमारे १३ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांची जुन्या पुलावरून दिवसभर मोठी वर्दळ असते. सध्याचा पूल अरुंद असल्याने तेथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
जून २०२२ ला ती मुदत संपली आहे. काम संथ गतीने सुरू असल्याने महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने ठेकेदार व्ही. एम. मोतेरे कंपनीला महागाई भाव वाढ देणे बंद केले. सहा महिन्यांची मुदतवाढ देत दररोज १ हजार रुपये दंड लावला. ती मुदतही संपल्याने आता दररोज ५ हजार रुपये दंड लावला आहे. तरीही काम वेगात होत नसल्याने नाराजी वाढली आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी अधिका-यांसमवेत स्वतः पुलाच्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराला सक्त सूचना करीत एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे.
आयुक्तांनी पुलाच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदारांला सक्त सूचना केल्या आहेत. एप्रिल २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामाने गती घेतली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत पुलाच्या स्लॅबचे १०० टक्के काम पूर्ण होणार आहे, असे महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे कार्यकारी अधिकारी बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.











