न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या उपायुक्त मनीषा कुंभार यांची बदली झाल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार तहसीलदार अभिजित जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तर, उपायुक्त रामदास जगताप यांचीदेखील बदली झालेली असल्याने त्यांचा कार्यभार तीन अधिका-यांमध्ये विभागून दिला आहे, अशी माहिती सह-आयुक्त सुनिल पांढरे यांनी दिली.
तहसीलदार अभिजित जगताप यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजना, तत्कालीन पीसीएनटीडीएशी संबंधित जमीन व मालमत्ता विभागाची जबाबदारी, भूखंड, योजना आदींचे कामकाज सोपविले आहे.
उपायुक्त जगताप यांच्याकडे असणारा जमीन व मालमत्ता विभाग (पीएमआरडीए) आणि महानगर आयुक्तांचे विशेष कार्य अधिकारी आदींचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त प्रवीण ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तर, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी पद आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी, पीएमआरडीएचे अधिक्षक अभियंता प्रशांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
पीएमआरडीएच्या सह-आयुक्त मोनिका सिंग यांची बदली…
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त मोनिका सिंग यांची बदली झाली आहे. सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना राज्य सरकारने नवा कार्यभार सोपवला आहे. मोनिका सिंग यांच्याकडे पीएमआरडीएमध्ये अनधिकृत बांधकाम निर्मूलन व निष्कासन विभागाची जबाबदारी होती, दरम्यान, सिंग यांचा अतिरिक्त कार्यभार तूर्तास पीएमआरडीएचे सह-आयुक्त सुनील पांढरे (प्रशासन विभाग) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार असेल.