न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२४) :- लायन्स पॉईंट येथे बुधवारी रात्री दरीत पडलेल्या २१ वर्षीय युवतीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला यश आले आहे.
साक्षी रमेश होरे (वय २१, रा. म्हासाडे, कान्हूरकर वस्ती, दावडी खेड, पुणे) असे मृत युवतीचे नाव आहे. ती आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. लोणावळ्यात ती एकटीच आली होती.
लायन्स पॉईंटच्या दरीमध्ये एक मुलगी पडली असल्याचा फोन शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला बुधवारी रात्री नऊ वाजता आला. रात्र असल्याने सकाळी लवकर शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सकाळी सहा वाजता शिवदुर्ग रेस्क्यू पथक लायन्स पॉईंट या ठिकाणी दाखल झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते, विजय गाले लायन्स पॉईंट या ठिकाणी पोहोचले होते. शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील योगेश उंबरे, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, योगेश दळवी, महेश मसने, आदित्य पिलाने, सिद्धेश निसाळ, कुणाल कडू, अशोक उंबरे, यश सोनावणे, विनायक शिंदे, मयूर दळवी, रमेश कुंभार, गौरव कालेकर, कपिल दळवी, समीर देशमुख, अशोक उंबरे, राजेंद्र कडू यांनी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले.











