- सरचिटणीसपदी संजय खाडे तर सचिवपदी विजय गुलदगड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- राज्यातील सरकारी वीज कंपन्यांमधील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी दिनेश लडकत (पुणे), सरचिटणीसपदी संजय खाडे (लातूर) आणि संघटन सचिवपदी विजय गुलदगड (पुणे) यांची निवड झाली.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या संघटनेच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनात उपस्थित सदस्यांकडून राज्य कार्यकारीणीची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारीणीमध्ये कार्याध्यक्ष- संजय चव्हाण, दीपक ढोले, उपसरचिटणीस- प्रणेश शिरसाठ, नंदकिशोर साटकर, कोषाध्यक्ष- प्रवीण गायकवाड, सहसचिव- उमेश काळे, सुनिल पावडे व अजय गुळवे तर महिला प्रतिनिधी म्हणून मंजूषा दुसाने व अर्चना घोंडबरे यांचा समावेश आहे.
महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व एमएसईबी सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांची ही संघटना प्रतिनिधीत्व करते. सर्व संवर्गातील अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्थापनाकडे जोमाने पाठपुरावा करण्यात येईल तसेच कंपनीच्या हितासाठी संघटना सदैव कार्यरत राहील अशी माहिती सरचिटणीस संजय खाडे यांनी दिली.