न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी सलाईन मधून विष देण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मला गोळी घाला, मारून टाका मी स्वतः फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुंबईला येतो, असे आव्हान देऊन मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले आहेत.
त्यांच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मराठा बांधव मुंबईकडे जाणार व सागर बंगल्यावर जरांगे पाटील यांच्यासह आंदोलन करणार, असे डॉ आंबेडकर चौक आंबेडकर पुतळा, पिंपरी येथे झालेल्या शहरातील मराठा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले. झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांच्यावर जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करावी, सत्तेच्या लालशेपोटी राज्यातील काही मराठा राजकारणी फडणवीस यांची वकिली करत आहेत. जरांगे पाटील यांना विरोध करत आहेत. त्यांचा झालेल्या बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. रात्रीच शहरातील हजारो बांधव शेकडो वाहनांनी मुंबईकडे रवाना होत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोरील उद्यानात झालेल्या बैठकीत प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, ओमकार देशमुख, नकुल भोईर, अभिषेक म्हसे, निखिल गणूचे, वसंत पाटील, सुनिता शिंदे, गिरीश कदम, मोहन जगताप, प्रकाश बाबर, चंद्रशेखर कणसे, गणेश देशमुख, स्वप्निल परांडे, श्याम पाटील, वाल्मीक माने, कल्याण पाटील, प्रदीप काटे, पांडुरंग प्रचंडराव, संपत बांगर इत्यादींसह बहुसंख्य मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.











