- सिंगापूर, अमेरिकेसह इतर देशातील कंपन्यांनी देखील भरलं ‘टेंडर’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२४) :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठीच्या निविदांना दोनदा दिलेली मुदत मंगळवारी (दि.१६) समाप्त होत आहे. आतापर्यंत १९ कंपन्यांनी निविदा भरल्या असून त्यामध्ये चार परदेशी कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.
पूर्व व पश्चिम रिंगरोडची एकूण लांबी १२२ किमी असून रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असणार आहे. यामध्ये पूर्व रिंगरोड हा ७१.३५ किमी लांबीचा तर पश्चिम रिंगरोड हा ६५.४५ किमी लांबीचा आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे भूसंपादन जवळपास ऐंशी टक्के झाले आहे. प्रत्यक्ष काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया महामंडळाकडून राबविण्यात आली. दिलेल्या मुदतीत प्रतिसाद कमी मिळाल्याने निविदा भरण्यास २६ मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात होती. या मुदतीत आणखी काही कंपन्यानी निविदा भरल्या, तर काही कंपन्यांनी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केल्याने १६ एप्रिलपर्यंत महामंडळाकडून मुदत वाढविण्यात आली होती.
१९ कंपन्यांनी निविदा भरल्या असून भारतीय कंपन्यांबरोबरच सिंगापूर, अमेरिका आणि अन्य दोन देशातील कंपन्यांनी या कामासाठी निविदा भरल्या आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेच्या काळात निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर दाखल निविदा उघडण्यात येतील. आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाचे आदेश दिले जातील.