न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या शंभर मीटर आतमध्ये मोबाईल नेण्यास बंदी केल्यामुळे मोबाईल असलेल्या मतदारांना पोलीस मतदान केंद्रामध्ये सोडत नव्हते. परिणामी अनेक मतदारांनी पोलिसांशी हुज्जत घातली. अखेरीस नाराज होऊन बहुतांशी मोबाईल धारक मतदारांनी मतदान न करताच केंद्रातून काढता पाय घेतल्याचे सर्वत्रच चित्र दिसत होते. त्यामुळे निश्चितच मतदानाची टक्केवारी घटली असल्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या झालेल्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामधील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये अनेक मतदारांनी त्यांच्या उमेदवाराला मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामधून निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीवेळी आयोगाने मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी केली आहे. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर याबाबत सूचना लावण्यात आल्या होत्या. तसेच प्रवेशद्वारावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जे मतदार मोबाईल घेऊन येत होते त्यांना पुन्हा माघारी पाठवले जातहोते. शंभर मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय नसल्याने पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग ओढावले. तसेच अनेक मतदार मतदान न करताच पुन्हा माघारी फिरले.
अनेक मतदारांनी आपले मतदार यादीतील नाव ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये शोधले. त्यामुळे त्यांची वोटर स्लिप देखील मोबाईलमध्ये होती. त्यामुळे असे मतदार मोबाईल घेऊनच आतमध्ये जाण्याचा आग्रह धरत होते. परिणामी पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये खटके उडाल्याचे चित्र होते.















