न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- प्रचाराच्या रणधुमाळीतून मोकळे झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी मुंबई गाठली. जवळ येऊन बिलगलेल्या नातवंडांच्या प्रेमपूर्वक स्पर्शाने आजोबा हरखून गेले. दोन महिन्यांनंतर मोकळा वेळ मिळालेल्या आढळराव यांनी झोपाळ्यावर झुलण्याचा आनंदही लुटला.
शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदान सोमवारी झाले. प्रचाराच्या रणधुमाळीतून मोकळे झालेले शिवाजीराव नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी सहा वाजता तयार झाले. न्याहरी आणि चहापान होईपर्यंत लांडेवाडी (ता. आंबेगांव) येथील बंगल्यावर भेटीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन आढळराव यांनी विचारपूस केली.
‘दादा, तुम्ही चौकार मारणारच,’ असे प्रत्येक कार्यकर्ता उत्साहाने सांगत होता. या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. दोन महिन्यांनंतर नातवंडांच्या भेटीसाठी त्यांची गाडी थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाली. प्रवासामध्ये त्यांचा भ्रमणध्वनी सतत खणाणत होता. प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधताना त्यांच्या गाडीने मुंबई कधी गाठली, हे खुद्द आढळराव यांनाही समजले नाही.











