- ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप’वरील ‘जॉब पोर्टल’द्वारे मिळेल प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२४) :- महापालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपवरील जॉब पोर्टलवर शहरातील रोजगार संधीची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. या जॉब पोर्टलमुळे रोजगाराच्या शोधात असणारे नागरिक आणि शहरातील आस्थापना यांच्या दरम्यान एक सेतू निर्माण होणार आहे. तरी, उद्योजकांनी आपणाकडे उपलब्ध असलेल्या नोकर्यांच्या रिक्त जागांची माहिती द्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड यांनी केले आहे.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांचे अधिकृत मोबाईल अॅप आहे. या अॅप अंतर्गत नागरिकांसाठी ‘जॉब पोर्टल’ ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. संबंधित जॉब पोर्टलवर शहरातील रोजगार संधींची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे जॉब पोर्टल केवळ रोजगाराची माहिती देणारे पोर्टल आहे. जॉब पोर्टलमुळे नागरिकांना रोजगाराची माहिती सुलभपणे उपलब्ध होऊन रोजगार निर्मिती होईल. तसेच विविध आस्थापनांना कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी देखील सहाय्य होणार आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत मिळणार आहे. प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या माहितीस संबधित कंपनी सर्वस्वी जबाबदार असणार आहे. तरी, लघुउद्योग संघटनेचे सभासद असलेल्या उद्योजकांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा. आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकर्यांच्या रिक्त जागांची माहिती द्यावी.
या रिक्त जागा पिंपरी चिंचवड स्मार्ट सारथी जॉब पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील. ज्यामुळे ही माहिती व्यापक स्वरुपात नागरिकांपर्यत पोहोचेल आणि भरती प्रक्रिया सुलभ होईल. हा उपक्रम सुलभ करण्यासाठी एकूण पदांची संख्या, पदांची नावे, कंपनीचे नाव, संपर्क व्यक्तीचे नाव, ई-मेल आयडी, एकूण रिक्त पदे, कामाचे स्वरुप, रिक्त पदाची प्रारंभ तारीख आणि शेवटची तारीख आदी माहिती पीडीएफ स्वरुपात be@bmbindia.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.