- नागरिकांच्या कामांना बगल देत अधिकाऱ्यांचा बैठका घेण्यावर जोर..
- दूरचा प्रवास करून कामासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप..
- पीएमआरडीए आयुक्तांचे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 10 डिसेंबर 2024) :- पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयात नागरिकांना भेटण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत देखील अधिकारी बैठका घेण्यावर जोर देत आहेत. परिणामी, नागरिकांची विविध कामे आणखी लांबणीवर पडली आहेत. प्रश्न, समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी नागरिकांना कार्यालयाचे अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातच कार्यालयात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने नागरिकांना संबंधित विभागाचा अधिकारी शोधत फिरावा लागत आहे. त्यामुळे पीएमआरडीएचा कारभार सध्या संथगतीने सुरु असल्याचा प्रत्यय येत आहे.
पुणे महानगर प्रदेश (पीएमआरडीए) सुमारे ७२५६.४६ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि बेंगळुरूनंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे हे क्षेत्र आहे. पीएमआरडीए हद्दीत पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ८१६ गावांचा समावेश असून, ७३ लाख लोकसंख्या आहे. पीएमआरडीएचे कामकाज आकुर्डी येथील सात मजली प्रशासकीय इमारतीतून सुरू आहे. सातव्या मजल्यावर आयुक्त तसेच अध्यक्षांचा कक्ष आहे. विविध कामांसाठी जिल्ह्यातून शेतकरी, उद्योजकवर्ग, बांधकाम व्यवसायिक आणि विविध क्षेत्रातील नागरीक आवास योजना, गृहप्रकल्प, जमिनीविषयक माहिती, यासारखी महत्त्वाची कामे घेऊन अधिका-यांच्या भेटीसाठी या कार्यालयात येतात. मात्र, नागरिकांना अधिकाऱ्यांची तासनतास वाट पाहात बसावे लागत आहे.
अनेकदा अधिकारी आयुक्तांसोबत मिटिंगमध्ये आहेत. काय काम आहे?, अर्ज दाखल करून नंतर भेटा, यासारखी कारणे तेथील कर्मचा-यांकडून नागरिकांना दिली जात आहेत. दूरचा प्रवास करून कामासाठी आलेल्या नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत भेट होत नसल्याने अक्षरशः त्यांना पुन्हा माघारी जावे लागते. प्रत्यक्षात अनेक हेलपाटे मारूनदेखील त्यांची कामे होत नसल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
”नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पीएमआरडीएचा कारभार काही काळ ठप्प झाला होता. अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने नागरिकांची कामे लांबणीवर पडली होती. आता कारभार पूर्वपदावर आलेला असताना देखील अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावातून दूरवरचा प्रवास करून आलेल्या नागरीकांमध्ये पीएमआरडीएच्या कारभाराबद्दल चीड निर्माण होत आहे. पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती देऊन विस्कळीत कारभार सुरळीत करावा, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे”.
कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या कामांना प्राधान्यक्रम दिला जातो. अधिकारी त्याबाबत सजग आहेत. नागरिकांची कामे वेळेवर होतात. – मा. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी – पीएमआरडीए…












