- एका मोठ्या कंपनीत वायू गळतीची दुर्घटना..
- काही कामगारांचा मृत्यू, काही गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे, (दि. 10 जून 2026) :- मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका औद्योगिक कंपनीमध्ये वायूगळतीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे जण उपचाराधीन आहेत. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या उत्पादन विभागात नियमित काम सुरू असताना अचानक वायूगळती झाल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित विभागातील काही कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेत वैभव थोरात आणि गौरीशंकर शर्मा या कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर श्रीकृष्ण साहू, गणेश उंबरे आणि नरसिंह पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा, पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावित विभाग रिकामा करण्यात आला तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, वायूगळती नेमकी कशामुळे झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाड, यंत्रणेमधील दोष किंवा अन्य कोणते कारण याबाबत संबंधित यंत्रणा तपास करीत आहेत. अधिकृत अहवाल आल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेनंतर औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची मागणी होत आहे. तळेगाव पोलीस आणि संबंधित विभाग पुढील तपास करीत आहेत.














